मी म्हातारा झाल्यावर माझ्या मुलांना - नातवंडांना एका एका थरारक आणि जबराट लढाईची प्रेरणादायी गोष्ट सांगेन..हे ही सांगेन की 'अरे, हे सगळं माझ्या डोळ्यासमोर घडलंय !'

लढाई होती कुणाकुणामध्ये माहितीये का??
एक अख्खी देशव्यापी शिस्तबद्ध बलाढ्य यंत्रणा विरूद्ध एक एकाकी पडलेला जखमी वयोवृद्ध योद्धा ! ए क टा !! त्याचं बुडतं जहाज पाहुन एकेक साथीदार त्याची साथ सोडून गेला होता. तसं पाहिलं तर लढाई एकतर्फी होती. त्या बलाढ्य यंत्रणेच्या 'डाव्या हाताचा मळ' होती.

या म्हातार्‍याला 'हूल' देण्यासाठी यंत्रणेनं पहिला डाव टाकला. युद्धाच्या तोंडावर त्याला 'इडी'ची धमकी दिली गेली. हा फकड्या उठला आणि शड्डू ठोकून जोमानं इडीवरच चाल करून गेला ! इडी हादरलं-थरथरलं ! आणि नेमका तोच जोम नकळत जनतेच्या मनामनात पेरला गेला.. तिथंच पहिली ठिणगी पडली !

त्या भव्य यंत्रणेला चाहूल लागली, हे म्हातारं सोपं नाही. मग त्यांनी 'साम-दाम-दंड-भेद' सगळं वारेमाप वापरलं.. देशभरातले मोठमोठे नेते आणून जागोजागी नेत्रदिपक-झगमगीत इव्हेन्टस् केले. 
मग या ८० वर्षांच्या निधड्या छातीच्या मर्दानंही एकहाती सगळी सूत्रं हातात घेतली. उभं-आडवं राज्य एकट्यानं पिंजून काढलं... जखमी पाय आणि दुर्धर आजारानं थकलेलं शरीर घेऊन जनतेशी थेट संवाद साधला ! त्याच्या सभेत त्या यंत्रणेसारखा लखलखाट-चकचकाट नसायचा. साधेपणा असायचा. घसा खरवडून रेकून ओरडणं नसायचं-मायेनं साद घालणं असायचं. त्याच्या सच्चेपणाची 'जादू' अशी झाली की जनतेत उत्साहाची लाट पसरू लागली.
यंत्रणेचं धाबं दणाणलं. यातायात करून कशीबशी धडपडत सत्ता मिळाली आणि सुटकेचा श्वास सोडला ! 
सत्ता मिळूनही त्यांचे अनुयायी पराभूत मानसिकतेनं फिरताना...सोशल मिडीयावर विषारी पोस्ट कमेन्टस् करताना..चिडचिड करताना दिसले ! 

त्या म्हातार्‍या मर्द गड्यानं सळसळत्या रक्ताची तरूणाई विधानसभेत विरोधी पक्षात नेऊन बसवली !! तरूणाईला पुढच्या विजयी प्रवासाची दिशाच मिळाली. सत्ता न मिळूनही रस्त्यारस्त्यावर-घराघरात-संपूर्ण सोशल मिडीयावर-जल्लोषी वातावरण झाले ! अफाट उत्साह पहायला मिळाला !! कमाल, निव्वळ कम्माल !!!

शेवटी मी नातवंडांना हे सांगेन की, त्या वृद्ध योद्ध्यानं मला शिकवलं की, 'तुझ्यात 'जिगरा' असेल तर तू एकटा जग जिंकू शकतोस.'
त्यानं मला हे ही शिकवलं की,  'बळ वापरून कुणावर सत्ता मिळवणं वेगळं
 अाणि 
नकळत कुणाच्या 'मनावर' सत्ता गाजवणं वेगळं..'

सलाम त्या लढवय्याला!!!

- किरण माने